पुणे : एकीकडे कौमार्य चाचणीवरून ‘कंजारभाट’ समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुण्या-मुंबईमध्ये वर्षाला जवळपास 20 ते 30 तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरतर स्त्रीचं ’योनीपटल’ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग, खेळ किंवा व्यायामाने देखील आतला पापुद्रा फाटू शकतो हे सत्य वैद्यकीय तज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘कौमार्य’ विषयीचा दृष्टीकोनला बदलू शकलेला नाही, हे दुर्देव म्हणावे लागेल. ‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणा-या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रसिद्ध कॉस्मँटिक व प्लँस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्त्रबुद्धधे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, योनीपटलावर एक पापुद्रा असतो. पण प्रत्येक मुलीला तो जन्मजात असतोच असं नाही. मात्र आपल्याकडे असा एक समज आहे की लग्नानंतर शरीरसंबंधावेळी हा पापुद्रा फाटला तर त्या तरूणीचे कौमार्य सहीसलामत आहे. खरेतर हेच केवळ पापुद्रा फाटण्याचे एकमेव कारण असू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. तरूणी जेव्हा आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुस-या तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवं आहे असे मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो. तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फारकाळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------------------------------------------
'' कौमार्य'' शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 6:00 AM
‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले.
ठळक मुद्देतरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला, पुण्या-मुंबईत वाढले प्रमाण