दीपक जाधव, पुणेपुणे आरटीओ कार्यालयामध्ये जुनी रिक्षा स्क्रॅप (नष्ट) करण्यात आल्याची नोंद करून त्या परवान्यावर नवीन रिक्षा रस्त्यावर आणल्या जातात. मात्र प्रत्यक्षात रिक्षा स्क्रॅप केल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून जुन्या रिक्षा पुन्हा अवैध वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. शहरात स्क्रॅप केलेल्या हजारो रिक्षा धावत असल्याचे उजेडात आले आहे. रिक्षाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या रिक्षाचे ४ तुकडे करून ती स्क्रॅप करणे कायद्याने बंधनकारक आहे. दररोज सरासरी १० ते १५ रिक्षा आरटीओ कार्यालयामध्ये स्क्रॅप केल्या जातात. गेल्या ८ वर्षांत किती रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या याची सविस्तर माहिती पुणे शहर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे यांनी माहिती अधिकारामध्ये मिळविली. त्यातून हजारो स्क्रॅप रिक्षा पुन्हा रस्त्यावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आरटीओकडून ४५ हजार अधिकृत रिक्षा परवाने वितरीत करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात ४५ हजार रिक्षाच रस्त्यावर धावणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील रिक्षांची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त आहे. सन २००७ ते २०१४ या कालावधीमध्ये ११ हजार ५६१ रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्याची आकडेवारी आरटीओकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापूर्वीही मोठ्या प्रमाणात रिक्षा स्क्रॅप झाल्या आहेत. स्क्रॅप केलेल्या रिक्षा या कोंढवा, स्वारगेट, पुणे स्टेशन, सिंहगड रोड, कात्रज, हडपसर, सय्यदनगर, आंबेगाव, खडी मशिन चौक, साळुंके विहार, सांगवी, पिंपळे गुरव, नगर रोड, येरवडा, चंदननगर, वडगावशेरी, नाशिक फाटा, चाकण या भागामध्ये प्रामुख्याने अवैध वाहतूक करीत आहेत. इतर शहरातल्या स्क्रॅप रिक्षांचे प्रमाणही मोठे आहे. आरटीओचे अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्यासमोरच ही अवैध वाहतूक सुरू असताना अशा रिक्षांवर काहीही कारवाई केली जात नाही.
हजारो स्क्रॅप रिक्षा धावतात रस्त्यावर
By admin | Published: April 13, 2015 6:22 AM