पुणे : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेत असल्याचे सांगून आता एसटीचा संप मिटला असे जाहीर केले. वास्तविक पाहता राज्यांत कुठेच एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नाही. संप सुरूच आहे. पुणे विभागातील जवळपास ३ हजार कर्मचारी अजूनही संपातच आहे. त्यामुळे पुणे विभागातील जवळपास ८०० गाड्या या आगारातच थांबून असल्याचे चित्र आहे.
एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर यांच्याशी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चा केली. यानंतर गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याचे सांगितले. यावर अनिल परब यांनी संप मिटला असल्याचे जाहीर करून टाकले. मात्र प्रत्यक्षात संपात कोणत्याही संघटनेचे कर्मचारी नसून संपात थेट कर्मचारीच उतरले. त्यामुळे हा संप सुरूच आहे. पुणे विभागातील जवळपास ८०० गाड्या आगारातच थांबून आहेत. तर जवळपास ३ हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. त्यामुळे विभागाला रोज १ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
१३ आगार तर कर्मचारी ४,२७५
पुणे विभागांत एकूण १३ आगार आहेत. यात एकूण ४,२७५ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी प्रत्यक्षांत ९९० कर्मचारी कामावर परतले आहेत. तर ५२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. तर २७६० कर्मचाऱ्यांनी अद्याप संपात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
४० कर्मचाऱ्यांची सेवा संपण्याची शक्यता
पुणे विभागाने जवळपास ४० कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस दिली आहे. यासाठी त्यांना सात दिवसांत कारणे दाखवा असे सांगितले होते. त्यावरील उत्तर देण्यासाठी गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी जर ते उत्तर दिले अथवा कामावर परतले तर त्यांच्यावर कोणतेही कारवाई होणार नाही. मात्र ते गुरुवारीदेखील कामावर परतले नाही. तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणार आहे.
४५ दिवसांत ४५ कोटींचे नुकसान
पुणे विभागाचे दररोज १ कोटीचे उत्पन्न आहे. गेल्या ४५ दिवसांत पुणे विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या ४५ दिवसांत जवळपास ४५ कोटींचे नुकसान झाले आहे. रोजचे उत्पन्न काही हजारात आले आहे.
''संपामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. काही कर्मचारी कामावर परतल्याने काही मार्गावर आम्ही गाड्या सोडल्या आहेत असे पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले.''