लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच नैसर्गिक समतोल जपण्यासाठी मराठवाड्यातील विविध गावांमध्ये एक हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प मराठवाडा जनविकास संघ पिंपरी-चिंचवड शहर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे. या झाडाचे स्वत: लक्ष घालून संगोपन करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.मराठवाडा जनविकास संघ २०१४ पासून झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा, पृथ्वी वाचवा हा वृक्षसंवर्धन सप्ताह राबवित आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात महापालिकेने लावलेल्या झाडांना पाणी घालून ती जगविण्यात येत आहेत. पुढील आठवडाभरात पावसाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर पाच ते सहा फूट उंचीचे वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांभूळ, फणस, सोनचाफा, गुलमोहर, पेकसपाम, आंबा, मनिला गिरिन, सिल्वर अशी पक्ष्यांना खाद्य देणाऱ्या व उन्हाळ्यातही तग धरणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट, युवक वर्ग, महिला सहभागी होणार आहेत.
मराठवाड्यात हजार वृक्षवाढीचा संकल्प
By admin | Published: May 26, 2017 6:11 AM