लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होत असताना गुडलक चौक ते संभाजी महाराज पुतळ्यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून ध्वनिक्षेपकावर घोषणा दिल्याप्रकरणी सांगलीच्या शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह संजय जडर, पराशर माने, अविनाश मरकळे आणि रावसाहेब देसाई आणि इतर हजार कार्यकर्त्यांविरूद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मिरवणुकीची परवानगी आणि ध्वनिक्षेपक लावण्यासाठीचा परवाना नसतानाही संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली भगवे फेटे परिधान करून तब्बल हजार कार्यकर्ते दिंडीमध्ये सहभागी झाले. त्यामुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना अडथळा निर्माण झाला. त्याला दिंडीप्रमुखांनी आक्षेप घेतल्याने पालखी सोहळा काही वेळ थांबून राहिला. हातात मशाल आणि तलवारी घेत संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्यापुढे चालत होते, अशी तक्रार पोलिसांकडे चोपदारांनी केली होती. सर्व कार्यकर्ते ध्वनिक्षेपणाचा वापर करून घोषणा देत होते. त्यानंतर संभाजीमहाराज पुतळा येथे एकत्रित जमून परवानगी नसतानाही सभा घेण्यात आली.परंपरेप्रमाणे जगनाडे महाराजांच्या पालखी सोहळ्यानंतर माऊलींचा सोहळा चालत असतो. मात्र हे कार्यकर्ते मध्येच चालल्याने संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे बाळासाहेब चोपदार यांनी त्यांना ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षीही असाच प्रकार झाला होता. त्यामुळे आळंदी देवस्थानच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. या वेळी कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तरीही काल हा प्रकार घडला.भिडेंना पुण्यात येण्यास मनाई करावीवैभवशाली परंपरा असलेल्या पालखी सोहळयामध्ये घुसखोरी करून संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या समर्थकांनी हा सोहळा कलंकित करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात येऊन लुडबूड करण्याचा अधिकार यांना कुणी दिला आहे. आगामी काळात गणेशोत्सव व इतर उत्सावांच्या काळात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संभाजी भिडे यांना पुण्यात येण्यास पोलिसांनी मनाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सोमवारी केली.संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा फर्ग्युसन रस्त्यावर आल्यानंतर त्यामध्ये घुसखोरी केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह एक हजार जणांविरूध्द डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पालखी सोहळयात झालेल्या या घुसखोरीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.चेतन तुपे म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयाला १६८५ साली सुरूवात झाली. या वैभवशाली परंपरा असलेल्या सोहळयामध्ये संभाजी भिडे व त्यांच्या समर्थकांनी घुसखोरी करून हा सोहळा कलंकित करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाजी भिडे यांचा इतिहास पाहिला असता त्यांचे मुळ नाव संभाजी नसून मनोहर असल्याचे दिसून येते. पालखी सोहळा हा वैष्णवांचा मेळा असताना तिथे शस्त्रधारी लोकांचे काय काम आहे.’’ अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पालख्यांमधील मानाच्या दिंडयांचा क्रम ठरलेला आहे. यामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही. तरीही हातात तलवारी घेऊन काही लोक आतमध्ये शिरले. ते आतमध्ये शिरेपर्यंत पोलीस झोपले होते का. याप्रकरणी वारकऱ्यांना झालेल्या त्रासाबदद्ल आम्ही माफी मागतो. आगामी काळ हा गणेशोत्सव व इतर उत्सावांचे आहेत, त्यामुळे संभाजी भिडेंना पुण्यात पोलिसांनी मनाई करावी.’’संजय भोसले म्हणाले, ‘‘संभाजी भिडे यांचे मुळ नाव मनोहर भिडे असे आहे. त्यामुळे डेक्कन पोलिसांनी संभाजी भिडे नावाच्या व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल न करता तो मनोहर भिडे या नावाने गुन्हा दाखल करावा.’’
संभाजी भिडे यांच्यासह हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा
By admin | Published: June 20, 2017 7:14 AM