पुणे : शेती व्यवसाय अभ्यासक्रमाला निवड न झाल्याच्या कारणावरून चिडलेल्या तरुणाने विभागीय कृषी सहसंचालकांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच रिव्हॉल्वरचा धाक दाखवत कृषी अधीक्षकांना जिवे मारण्याची धमकी दिली.केदार रायजी साळुंके (मु. पो. दुगाव, जि. नांदेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कृषी अधीक्षक विनयकुमार आवटे (वय ४४, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवटे कृषी अधीक्षक आहेत. साळुंके हा कृषी महाविद्यालयामध्ये एका कोर्ससाठी आलेला होता. त्याने शेती व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज भरला होता; परंतु त्याला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने आवटे यांच्या दालनामध्ये जाऊन ‘माझी अभ्यासक्रमाला निवड का झाली नाही?’ अशी विचारणा करीत आरडाओरडा करून कार्यालयातील टीपॉयवरची काच फोडली. जवळचे रिव्हॉल्वर काढून ‘मी तुला संपवतोच’ असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विद्यार्थ्याला अटक केली. (प्रतिनिधी)
कृषी अधीक्षकाला जिवे मारण्याची धमकी
By admin | Published: December 08, 2014 1:19 AM