धनकवडी : महिलेचा डीपी असलेल्या व्हॉटसअप वरुन चॅटींग करुन त्याचा न्यूड व्हिडिओ बनवून तो अपलोड करण्याची भिती दाखवून तरुणाला ब्लॅक मेल केले जात होते. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमोल राजू गायकवाड (वय २२ वर्षे, रा. तानाजी नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गायकवाड हा आयटीआय झाला होता. त्याला एका अनोळखी महिलेचा डीपी असलेला व्हॉटसॲप आला. त्याने त्याला प्रतिउत्तर दिल्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरु झाले. चॅटींग करुन त्याचा न्यूड व्हिडिओ बनविला गेला. तो अपलोड करण्याची भिती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली. त्यांच्याकडून वेळोवेळी ४ हजार ५०० रुपये फोन पे वरुन घेतले. या मानसिक त्रासाला कंटाळून अमोल याने “मै सुसाईड कर रहा हु" असा मेसेज नमूद करुन तो मोबाईल धारकास पाठविला. तेव्हा त्याने "करो मै व्हिडिओ ऑनलाइन करता हुं" असे म्हणून सतत पैशांची मागणी केली. त्यामुळे ३० सप्टेबर रोजी दुपारी अमोल याने राहत्या घरी आत्महत्या केली.
याबाबत सहकारनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद करुन तपासाला सुरुवात केला यामध्ये त्यात अमोल याचा मोबाईल तपासला असता, व्हिडिओ, त्याचे झालेले चॅटिंग व त्याने फोन पे द्वारे पाठविलेले पैसे हा सर्व तपशील समोर आल्यावर त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले. पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर अधिक तपास करीत आहेत.