विमाननगर - बांधकामाच्या साईडवर केलेल्या फॅब्रिकेशनच्या कामाचे थकित 43 लाखांची मागणी करणाऱ्या व्यावसायिकाला विमाननगर येथील एका प्रसिद्ध बिल्डरने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला. वर्षभरापासून केलेल्या कामाचे 43 लाख रुपये बिल्डरने दिलेले नाहीत. त्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाला हात-पाय तोडून जीवे मारण्याची धमकी संबंधित बिल्डरने दिली आहे. विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी जात असताना पोलीस स्टेशनच्या आवारातच बिल्डरच्या साथीदारांनी तक्रार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली.या गंभीर प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने थेट पोलीस आयुक्तांकडे शुक्रवार (दि.23)रोजी तक्रार अर्ज दाखल केली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी देखील याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. या गंभीर घटनेमुळे व्यावसायिक व त्याचे कुटुंबीय धास्तावलेले आहेत. स्थानिक पोलिसांची भूमिका देखील या प्रकारात संशयास्पद आहे. बिल्डर त्यांचा वकील व इतर साथीदार तसेच काही पोलिस देखील या प्रकरणात सहभागी आहेत.स्थानिक पोलिसांकडून मदत न मिळाल्यामुळे सदर व्यावसायिकाने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. या बिल्डरची दहशत बघता केलेल्या कामाचे पैसे मागणाऱ्या व्यावसायिकाला धमकावले जाते ही बाब गंभीर असून शहरातील व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
थकित बिलाची मागणी करणाऱ्या व्यावसायिकाला बिल्डरकडून जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:09 PM