पुणे : मी सांगेल त्या मुलांना अकरावीत प्रवेश मिळालाच पाहिजे, असे म्हणत पालगनसारखे शस्त्र घेऊन पूना कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनमध्ये घुसून एकाने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कॅम्प परिसरातील पूना कॉलेजमध्ये ही घटना घडली.याप्रकरणी लष्कर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख (वय ५५, रा. सैनिकवाडी, वडगाव शेरी, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फारुख ऊर्फ गुड्डू युुसूफ शेख (वय २४, रा. घोरपडी) याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शेख आपल्या कार्यालयात दैनंदिन काम करीत बसले होते. त्यावेळी सुरक्षारक्षकास व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत शेख त्यांच्या केबिनमध्ये घुसला. मै फारुख शेख हूँ मुझे लोक गुड्डू बोलते है, असे म्हणत त्याने शर्टच्या आत लपविलेल्या पालगनसारख्या धारदार शस्त्राने प्राचार्यांच्या टेबलावरील काच फोडली. त्यानंतर मी ज्या मुलांना सांगेल त्यांना अकरावीत प्रवेश मिळालाच पाहिजे, अशी धमकी देत कार्यालयाचे नुकसान केले. आरोपीने डॉ. शेख यांनी १५ दिवसांपूर्वीदेखील अशा प्रकारे धमकी दिली होती. मात्र शुक्रवारी त्याने हत्याराचा धाक दाखवत कार्यालयाचे नुकसान केल्याने तक्रार दाखल केली.या प्रकारामुळे कॉलेजमधील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणानंतर शेख यांनी लष्कर पोलिसांना खबर दिली. त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी प्राचार्य शेख यांची भेट घेतली. काटे यांच्या पथकाने शनिवारी पहाटे शेख यास ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यावर सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष काटे तपास करीत आहेत.पूना कॉलेज प्राचार्यांवरील हल्ल्याचा निषेधपूना कॉलेज प्राचार्यांच्या केबिनमध्ये ‘सांगेल त्याला अकरावीसाठी प्रवेश द्यावेत,’ असे म्हणत पालगनसारखे शस्त्र दाखवून शुक्रवारी तोडफोड करण्यात आली. या घटनेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राचार्य फोरमतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. प्राचार्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.फारुख शेख (रा. लोहियानगर, पुणे) असे या हल्लेखोराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख हे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयात दैनंदिन काम करीत होते. त्यावेळी सुरक्षारक्षकांना न जुमानता शिवीगाळ करीत फारुख प्राचार्यांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने घुसला व शर्टच्या आत लपविलेले पालगन हे शस्त्र काढून त्याने टेबलावर ठेवले. मी सांगेल त्या विद्यार्थ्याला अकरावीमध्ये प्रवेश दिलाच पाहिजे, अशी दमदाटी त्याने केली. या घटनेमुळे महाविद्यालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राचार्य फोरमतर्फे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, सचिव डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. संजय खरात, डॉ. सी. एन. रावळ, डॉ. शोभा इंगवले, डॉ. काका मोहिते, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. नितीन घोरपडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करून या गुंडागिरीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी पूना कॉलेजच्या प्राचार्यांना धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:37 AM