पिंपरी : कामावरून कमी केले म्हणून नात्यातील महिलेचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी घेतली. त्यासोबतच आणखी २५ लाखांची मागणी केली. ही घटना दोन डिसेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी श्रीराज अनिल साळुंखे (वय ३४, रा. मारुंजी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अशोक सांगळे, रुद्र चाटे व त्यांचे पाच साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी अलोक याला कामावरून कमी केले होते. मात्र, त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या नात्यातील महिलेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन फिर्यादीकडून पाच लाखांची खंडणी घेतली. त्यासोबतच आणखी २५ लाख देण्याची मागणी केली. फिर्यादी पैसे देत नाही म्हणून आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून कोयत्याने हल्ला केला आहे.