पुणे : अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कपिल रवींद्र वाल्हेकर (वय- १८, रा. कोथरूड) याला शुक्रवारी (दि. १२) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, १७ वर्षीय मुलीने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते १२ एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात घडली आहे. पीडित मुलगी सिंहगड कॅम्पस मधील सौ. वेणूताई पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आरोपी कपिल याने तेथेच तिच्याशी ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर कपिल याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्या घरी जाऊन ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने व्हिडीओ काढण्यास नकार दिल्यावर आरोपीने बाथरुमची काच फोडून मुलीचा न्युड व्हिडीओ बनवला. त्यामुळे मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास त्याने सुरुवात केली.
हा व्हिडीओ मुलीला दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून मुलीने राहत्या घरात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. आरोपी कपिल याने शुक्रवारी (दि.१२) मुलीला फोन केला. त्यावेळी तिने त्याला घरी बोलावून घेत आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी कपिल विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कपिल वाल्हेकर याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कथले करत आहेत.