पुणे : व्याजाने घेतलेल्या पैशांच्या जवळपास दुप्पट रक्कम दिल्यानंतरही होस्टेलच्या ३ रुमचा ताबा व २ लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या सराईत गुंडासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना बाळु कुदळे (वय ४०, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) आणि मंगेश ऊर्फ गणेश भगवान दिघे (वय ३१, रा. राजीव गांधी पार्क, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. नाना कुदळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या व्यावसायिकाने कोथरड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील मोहन मिनी मार्केटशेजारी १६ एप्रिल २०२२ ते ३० मार्च २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यावसायात आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये गणेश दिघे याच्या मध्यस्थीने नाना कुदळे याच्याकडून ७ लाख रुपये १० टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. त्यांनी मुद्दल, व्याज व व्याजावरील दंड असे सर्व मिळून एकूण १३ लाख ८१ हजार रुपये परत केले. तरीही नाना कुदळे हा आणखी पैशांची मागणी करत आहे. ३० मार्च रोजी तो फिर्यादीच्या होस्टेलवर आला. त्याने तेथील सीसीटीव्हीची तोडफोड केली. येथील ३ रुमचा ताबा देण्याची व आणखी २ लाख रुपये देण्याची मागणी केली. ते न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.