इंदापूर : ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात धमक्या व मतदारांना पैसे देण्याचे जे प्रकार अनुभवास आले. अदृश्य शक्तीमुळेच हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ झाले आहे. हे चित्र अस्वस्थ करणारे व वेदना देणारे आहे,अशी प्रतिक्रिया बारामती लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान चालू असताना त्यांनी इंदापूर शहरास भेट दिली. मतदानाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्या म.गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी देश स्वातंत्र्यासाठी एकत्र येवून लढा दिला त्या देशात व छ.शिवाजी महाराज, शाहू,फुले, आंबेडकर,यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला अदृश्य शक्तीने दृष्ट लावली आहे. ज्यांच्याकडे सत्ता व पैसे आहेत त्यांनी भिती दाखवली तर लोक घाबरतात. सशक्त लोकशाहीमध्ये हे किती वाईट आहे. देश दडपशाहीकडे चालला आहे का? मनी व मसल्स हा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांच पहायला मिळतोय ही वेदना देणारी गोष्ट आहे. त्याचा व्होटिंग बँकवर किती परिणाम होईल या प्रश्नाला उत्तर देताना ते काळच ठरवेल असे त्या म्हणाल्या. कालचा प्रकार पहाताना टीव्ही सिरियल पहाते की सिनेमा बघते,असे मला वाटत होते. मला विश्वासच बसत नाही. इतक्या प्रेमाने जी नाती आपण जपून ठेवली होती. शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती. त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले आहे, असे त्या म्हणाल्या.
अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 4:32 PM