पुणे: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला पिस्टलच्या उलट्या बाजूने डोक्यात मारून त्याच्यावर पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुंढवा येथील केशवनगर येथे रविवारी (५ नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला. याप्रकरणी तीन जणांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कौशल लक्ष्मण पायघन (२१, रा. केशवनगर, मुंढवा) यांने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धार्थ शावळकर (२०, रा. केशवनगर) आणि राहुल धावरे (२१, रा. वडगाव शेरी) या दोघांना अटक केली आहे. तर सुमित गौड (२२, रा. वडगाव शेरी, पुणे) या तिघांवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलिस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौशल हा केशवनगर येथे मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या तोंड ओळखीचा मुलगा प्रवीण सिंग याला सिद्धार्थ, सुमित आणि राहुल हे मारहाण करत होते. कौशल त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेला असता राहुल धावरे याने कौशलचा गळा दाबून ढकलून दिले. तर सुमित गौड याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल काढून उलट्या बाजूने कौशलच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केल. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. सुमित गौड याने कौशलवर पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने पिस्टल काढल्याचे पाहून परिसरात जमा झालेले लोक देखील पळून गेले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करपे करत आहेत.