लोणी काळभोर : खुनाचा प्रयत्न, अवैधरीत्या हत्यार बाळगणे, मारामारी करणे यांसारखे गंभीर गुन्हे करून फरार असलेले तीन आरोपी ६ ऑगस्टपर्यंत न्यायालयापुढे फिर्यादीला उत्तर देण्यासाठी हजर न राहिल्यास त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याचे हद्दीत जानेवारी महिन्यात प्रणय दिलीप महाडिक (वय २०, रा. पौड, ता. मुळशी), सनी शाम चव्हाण (वय २०, रा. आंबेगाव मारणेवाडी ता. मुळशी) व अक्षय सुनील ऊर्फ रघुनाथ शेलार (वय २२, रा. बोरतवाडी, ता. मुळशी) यांनी एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून हे तिघेही आहेत.
आरोपी प्रणय महाडीक, सनी चव्हाण आणि रघुनाथ शेलार यांनी खुनाचा प्रयत्न, अवैधरीत्या हत्यार बाळगणे, मारामारी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे, बेकायदेशीररीत्या जमाव करून गर्दी करणे यांसारखे गंभीर गुन्हे पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले आहे. गुन्हे करून तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्याचे वॉरंट आले आहे. यामुळे तिघेही करवाईसाठी टाळण्यासाठी कोठेतरी लपून बसले आहेत.
यामुळे जिल्हा न्यायाधीश १८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा अतिविशेष न्यायाधीश गो. प्र. अग्रवाल यांनी वरील तिन्ही आरोपींना ६ ऑगस्ट २०२१ रोजी पुणे येथे न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ८२ नुसार आदेश केला आहे. तिन्ही आरोपी न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.