अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी औंध येथे जिल्हा पुनर्वसन केंद्र उभारण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांगांचा दरमहा निर्वाह निधी आणि इतर विविध योजनांमधील साडेतीन कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा काेट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. तो निधी वापरावा, अशी स्पष्ट मागणी प्रहार अपंग क्रांती संघटना आणि ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक खिडकी योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी जिल्हा पुनर्वसन केंद्र औंध येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारले जात आहे. ४०० चौ. मीटर जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
----
समितीला विश्वासात न घेता ठराव
जिल्ह्यातील पाच टक्के निधी नियंत्रण करण्याकरिता जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली आहे. मात्र, या समितीला विश्वासात घेऊन ठराव पास करून हा निधी वर्ग केलेला नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेऊन निधीची तरतूद करणे गरजेचे होते. डीडीआरसी केंद्र शासनाची योजना असून केंद्र आणि राज्य यांनी निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही पुणे जिल्हा परिषद यांनी प्रथमता निधी वळवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
-----
कोट
आम्ही न्यायालयात दाद मागणार
कोरोनामुळे जिल्ह्यातील २८ हजार ७०० दिव्यांग बांधवांचे आधीच रोजगार गेले आहेत. त्यांना मदत करायचे सोडून त्यांच्या हक्काच्या निधीवर गदा आणली जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर निर्णय नाही बदलला तर याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले.
----
कोट
पुणे जिल्हा परिषदेने साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुण्यातील केंद्र हे अद्ययावत व सुविधांयुक्त महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज केंद्र असणार आहे. परंतु, पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पडून असलेला निधी का वापरत नाही.
- सुरेखा ढवळे, प्रदेशाध्यक्ष, प्रहार अपंग, क्रांती संघटना
----
कोट
औंध येथे होणारे केंद्र हे दिव्यांगांसाठीच आहे. ते झाले तर त्याचा सर्वात जास्त फायदा दिव्यांगांना होणार आहे. प्रकल्प चांगला असल्याने दिव्यांगांसाठीच्या योजनांचा साडेतीन कोटी रुपयांचा निधी आम्ही काम सुरू होण्यासाठी घेतला आहे. पुढच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा नियोजन समितीकडूनही निधी घेणार आहोत. प्रकल्प चांगला असल्याने दिव्यांगांना खूप फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कोरोनाकाळात जशी मदत केली तशीच मदत आम्ही पुढे करणार आहोत.
- प्रवीण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी, पुणे जिल्हा परिषद