पुणे : अल्पबचत खात्यातील ४५ खातेदारांकडून पैसे घेऊन ते त्यांच्या खात्यात पैसे न भरता साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बचत योजनेच्या महिला एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे़.संगीता अनंत निकम (रा़ बापूजी बुवा मंदिर, कळस, विश्रांतवाडी) असे या महिला एजंटचे नाव आहे़. याप्रकरणी पुणे शहर पश्चिम विभागाच्या डाकघर सहायक अधीक्षक अंजु शर्मा (वय ३९, रा़ चंदननगर, खराडी) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१६ दरम्यान घडला आहे़. संगीता निकम या येरवडा येथील टपाल कार्यालयात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या एजंट आहे. त्यांच्याकडे असलेल्या महिलांच्या बचत खात्याचे पैसे त्या दरमहा गोळा करुन खात्यात भरत असत़. येरवडा टाऊनशिप टपाल कार्यालयात आवर्ती ठेव योजनेत ४५ जणांचे खाते आहे़. निकम यांनी डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१६ या काळात त्यांच्याकडून दरमहा पैसे गोळा केला़ परंतु, त्यांच्या खात्यात भरले नाही़ असे एकूण ३ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा अपहार केला़.टपाल खात्याच्या पश्चिम विभागाकडून या खात्यांची तपासणी करीत असताना या ४५ खात्यात पैसे भरले नसल्याचे उघड झाले़. त्यानंतर पश्चिम विभागाच्या सहायक अधिक्षक अंजु शर्मा यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. संगीता निकम यांनी खात्यात पैसे भरले नसल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी टपाल कार्यालयाकडे चौकशी केली़. या तक्रारींची दखल घेऊन टपाल खात्याने खात्याअंतर्गत चौकशी केली़ त्यात निकम यांनीच हे पैसे भरले नसल्याचे स्पष्ट झाल्यावर टपाल खात्याने त्यांच्याकडून व्याजासह पैसे वसुल केले़ पण, त्यात गुन्हा होत असल्याने टपाल खात्याच्या वतीने तक्रार देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले़. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बोबडे अधिक तपास करीत आहेत़.
महिला एजंटकडून साडेतीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 3:58 PM
येरवडा येथील टपाल कार्यालयात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या एजंट आहे. खातेदारांच्या खात्यात पैसे न भरता एकूण ३ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा अपहार केला़.
ठळक मुद्देसंगीता अनंत निकम असे या महिला एजंटचे नाव आहे़. टपाल खात्याच्या पश्चिम विभागाकडून या खात्यांची तपासणी करत असताना या ४५ खात्यात पैसे भरले नसल्याचे उघड झाले़.