पुणे : दौंड व नारायणगावातील वारुळवाडी अशा दोन ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ७६९ रुपयांची ६ इंजेक्शन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
दौंड येथील हुतात्मा चौकात अक्षय राजेश सोनवणे (वय २४, रा. गांधी चौक, दौंड), सुरज संजय साबळे (वय २३, रा. शालिमार चौक, दौंड) या दोघांना ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन, दोन मोबाईल, दुचाकी असा ९७ हजार ८७९ रुपयाचा माल जप्त केला आहे.
नारायणगावाजवळील वारुळवाडी येथे रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, पो. आपटाळे, ता. जुन्नर) याच्याकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन व मोबाईल असा २१ हजार ८९० रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकेश कदम, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजापुरे, दगडु विरकर यांनी ही कामगिरी केली. ........रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर खरेदी करु नकारेमडेसिविर इंजेक्शन शासनाने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे़ त्यामुळे या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकार्यांमार्फत थेट हॉस्पिटलला होत आहे. हे इंजेक्शन बाहेर मिळत नाही. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी ते बाहेर खरेदी करण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ अभिनव देशमुख यांनी केले आहे.