थेऊर / लोणीकाळभोर : कंपनीत भाडेतत्वावर वाहने लावतो असे आमिष दाखवून २८ वाहने भाड्याने घेऊन त्याचे १५ लाख रुपयांचे भाडे न घेता दोन कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या कडून २८ पैकी १३ वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलीस पथकाने केली.
मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८, रा. फ्लॅट नं ४०५, युनिटी टॉवर, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे ४८), ओंकार ज्ञानदेव वाटाणे ( वय २८, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता. दौंड) व मोहमद मुजीब मोहमद बसीरउद्दीन (वय ४८, व्यवसाय चालक, रा. १५-१७३/१३१/ए, पाणी टाकीजवळ, संतोषनगर, हैद्राबाद, राज्य तेलंगणा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्याम माहितीनुसार, याबाबत अविनाश बालाजी कदम यांनी वाहनांचे भाडे बुडविल्याची व वाहन परत न दिल्याची तक्रार केली होती. कदम हे ओला कंपनीमध्ये स्वत:ची स्विफ्ट डिझायर कार चालवितात. कार चालवित असताना त्यांची ओळख गिलानी याच्याशी झाली. त्याने तो नोएडा, उत्तर प्रदेश येथील युनायटेड एस एफ सी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरची कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे सांगून त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्वावर लावतो, असे सांगून आमिष दाखवून १५ मार्च ते २७ जुलै या साडेचार महिन्याच्या कालावधीत कदम व
त्यांच्या ओळखीच्या इतरांची एकूण २८ चारचाकी वाहने ताब्यात घेतली. सदर वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली व वाहने घेऊन फसवणूक करून तो फरार झाला होता. कदम यांनी कंपनीबाबत नोएडा ( उत्तर प्रदेश ) येथे जावून माहिती काढली असता त्यास अशी कोणतीही कंपनी मिळून आली नसल्याने त्यास त्याची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यानी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ करत होते.
१४ ऑगस्ट रोजी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार कारखेले व मुंढे यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदर गुन्ह्यातील इनोव्हा कार (एमएच १४ एफसी ०३७१) ही दौंड बस स्टॅन्ड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. तेथे जावून सापळा रचून वरील ३ जणांना इनोव्हा कारसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यावर पोलिसांनी कसून तपास करत महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील विजयनगर, ता. बिलोली, जि. नांदेड व बालकोंडा, जि. निजामाबाद, तेलंगणा येथून एकूण १ कोटी २२ लाख रुपये किंमतीच्या ४ इनोव्हा क्रिस्टा, १ मारुति सूझूकी इर्टिगा, २ स्विफ्ट डिझायर, ४ आयशर व२ अशोक लेलॅन्ड अशी एकूण १३ वाहने जप्त केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त पुणे शहर डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर, श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.