पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन वेगळे राहणार्या पत्नीचे अपहरण करुन तिला कारमधून घेऊन जाणाऱ्या पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी फलटणजवळ ताब्यात घेतले. अमोल देवराव खोसे (वय २४, रा. रोहिना, ता. परतूर, जि. जालना), महादेव निवृत्त खानापूरे (वय २२, रा बामणी, ता. परतुर, जि. जालना) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (वय २५, रा. परतुर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी खराडी येथे राहणार्या एका २६ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर बुधवारी मध्यरात्री १२ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला ही पतीपासून वेगळी राहत आहे. फिर्यादी या रात्री कामानिमित्त पायी जात होत्या. त्या खराडीतील मारवेल झपायर सोसायटीसमोर आल्या असताना कारमधून आरोपी आले. त्यांनी जबरदस्तीने फिर्यादीला कारमध्ये बसविले. यावेळी ररस्त्यावरुन जाणाऱ्या एकाकडे या महिलेने आपला मोबाईल टाकला. त्याला आपल्याला पळवून नेले जात असल्याचे ओरडून सांगितले. आरोपींनी तिचे हात पाय बांधून, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे धमकावून जबरदस्तीने पळवून नेले. मोबाईल घेणाऱ्या नागरिकाने ही बाब तातडीने चंदननगर पोलिसांना सांगितली. अपहरण झाल्यानंतर केवळ ६ तासात घेतला शोध
चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने या महिलेचा शोध सुरु केला. तेव्हा ही कार फलटणच्या दिशेने जात असल्याची त्यांना माहिती मिळाली. चंदननगर पोलिसांचे पथक तातडीने तिकडे रवाना झाले व त्यांनी कारचा शोध घेऊन या महिलेची सुटका केली व तिघांना ताब्यात घेतली. अपहरण झाल्यानंतर केवळ ६ तासात तिघांना पोलिसांनी अटक केली.