पुणे : गंभीर गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आडकाठी करून सराईत गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत केल्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला. सराईत गुन्हेगार पप्पू कडू याला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून देविदास वाल्हेकर (रा. कर्वेनगर), ज्ञानेश्वर मोहोळ (रा. आझादनगर, कोथरूड) आणि समीर शेख (रा. जनवाडी, गोखलेनगर) या तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. सराईत गुन्हेगार पप्पू कडू व त्यांची पत्नी नम्रता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई महेश काळे यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वाहन पेटवून देऊन नुकसान केल्या प्रकरणाचा एक गुन्हा पप्पू कडू याच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी पोलीस शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता पप्पू कडू याच्या म्हातोबानगर येथील घरी गेले होते. पप्पू कडूला ताब्यात घेत असताना त्याची पत्नी व इतरांनी पोलिसांबरोबर झटापट केली. त्याची पत्नी नम्रता हिने फिर्यादी यांचे दोन्ही हात पकडून व इतरांनी प्रतिकार करुन पप्पू कडूला पळून जाण्यास मदत केली. पप्पू पळून गेल्याने सरकारी कामात अडथळा आणण्याबद्दल पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.