घोडेगाव : चास येथील नळपाणी पुरवठा कामासाठी आणलेले पाईप गावाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव व ठेकेदार यांनी गैरहेतूने स्वत:च्या फायद्यासाठी परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याप्रकरणी शाखा अभियंता डी. एल. अंधारे यांनी तक्रार दिली आहे. घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. २० फेब्रुवारी २०१३ रोजी चास ग्रामीण पाणीपुरवठा समितीची सभा झाली. या वेळी कामासाठी ठेकेदाराने आणलेल्या पाईपपैकी जमिनीत टाकून शिल्लक राहिलेले पाईप सध्या दिसत नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली. या बैठकीनंतर शिल्लक राहिलेल्या पाईपची माहिती ग्रामस्थांनी घेतली असता ९,१८६ मीटरचे अंदाजे १६,५७,००० रुपये किमतीचे पाईप मिळून येत नाहीत, असे आढळून आले. पाईपची या तिघांनी परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या अपहार केल्याप्रकरणी शाखा अभियंता डी. एल. अंधारे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तिघांना अटक करून घोडेगाव न्यायालयात हजर केले असता गुरवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक के. के. भालेकर करीत आहेत.
अपहारा प्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: March 29, 2017 11:51 PM