पुणे : बिबवेवाडीत पूर्ववैमनस्यातून गुंडावर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या तिघांना पोलिसांनीअटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिघे सराईत असून, मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना दिली.
सनी शंकर जाधव यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात पवन सतीश गवळी (वय २८, रा. बिबवेवाडी ओटा परिसर) हा जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवन आणि साथीदारांनी २०२१ मध्ये पूर्ववैमनस्यातून सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. खून प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पवन दुचाकीवरून बिबवेवाडी भागातून निघाला होता.आरोपी सनीसह तिघांनी त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ साथीदारांनी पवनला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर पिस्तुलातून गाेळीबार केला. आरोपींबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत पवन बिबवेवाडी पोलिस ठाण्यात पोहोचला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. रात्री उशिरा तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.