पुणे : आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच पुणेपोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने म्हाडा परिक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण उघडकीस आणले. म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या रविवारी घेण्यात आलेल्या परिक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पुण्यातील जी. ए. साॅफ्टवेअर संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख याला सोपविण्यात आले होते. त्यानेच प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या परीक्षांना सुमारे अडीच लाख परीक्षार्थी बसणार होते. आता ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांंनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत जी. ए. साॅफ्टवेअरचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख (रा. महेंद्रा ॲथिंया, खराळवाडी, पिंपरी, पुणे), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, ओैरंगाबाद) यांना अटक करण्यात आली.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुळे उपस्थित होते.
याप्रकरणी म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास करण्यात येत असून रविवारी (१२ डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या म्हाडाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्न पत्रिका फोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ओैरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरातील संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात ओैरंगाबाद येथील टार्गेट करिअर पाॅइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम ॲकेडमीचा संचालक कृष्णा जाधव व त्यांचा सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे म्हाडा परिक्षेतील ३ उमेदवारांची प्रवेश पत्रे, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परिक्षेतील ३५ उमेदवारांच्या नावाची यादी सापडली. या तिघांना आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
तिघांना अटक केली असून त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
त्यांच्या चौकशीत डॉ. प्रितिश देशमुख याची माहिती मिळाली. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना देण्याची तयारी सुरू केली होती. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक मीनल पाटील, उपनिरीक्षक अनिल डफळ यांनी तातडीने तपास सुरू केला. विश्रांतवाडी येथे हरकळ आणि डाॅ. देशमुख मोटारीतून निघाले होते. पोलिसांच्या पथकाने मोटार अडवून तिघांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडे लॅपटॉप, ७ मोबाईल, पेन ड्राईव्ह, इतर कागदपत्रे सापडली. पेन ड्राईव्हमध्ये म्हाडाच्या तीनही परिक्षेच्या प्रश्न पत्रिका आढळून आल्या. तिघांना अटक केली असून त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस भरतीसह अनेक परिक्षांची जबाबदारी देशमुखकडे होती
गेल्या काही वर्षात राज्यात झालेल्या अनेक परिक्षा घेण्याची जबाबदारी डॉ. देशमुख याच्या जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. पोलीस भरतीची परिक्षाही घेण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, देशमुख याच्याकडे केवळ परिक्षा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, परिक्षेचा पेपर आम्ही कोणाकडेही दिला नव्हता.