पुणे : दोन महिन्यापूर्वी भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलास मोबाईल विक्रीच्या बहाण्याने बोलावून त्याचा कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वृषभ दत्तात्रय रेणुसे ( वय २३, रा. कृष्णदर्शन सोसायटी, आंबेगाव पठार), सचिन उर्फ दादा प्रकाश पवार (वय १९ रा. कांदेआळी, जनता वसाहत, आणि आकाश उध्दव नवाडे (वय २१, रा. आंबेगाव पठार) अशी कोठडी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह तीन अल्पवयीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ वाघमारे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दादासो मारूती बनसोडे (वय २३ रा. लक्ष्मी कॉलनी लेन नं. २, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे. पर्वती पायथा येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला होता.
खुनाचा हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याचा तपास करणे, गुन्ह्यांत वापरलेले हत्यार, आरोपीचे कपडे जमा करणे, या गुन्ह्यांत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करणे यासाठी त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत चार दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली.
-------------------------------------