पुणे : दुर्मिळ होत चाललेल्या मांडूळ सर्प जातीच्या प्राण्याची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन किलो वजनाचा मांडूळ जप्त केला असून, ते त्याची नऊ लाख रुपयांना विक्री करणार असल्याचे समोर आले आहे.
सौरभ अशोक जाधव (वय २१, रा. पिसोळी, ता. हवेली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार पळून गेले होते. पोलिस शिपाई महेश मंडलिक यांना माहिती मिळाली, की दोन व्यक्ती मांडूळाची विक्री करण्यासाठी अष्टद्वार सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सपाळा रचून कारवाई केली. त्यावेळी दुचाकीवरील दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तसेच, या कारवाईसाठी वनरक्षक गणेश सरोदे यांना बरोबर घेतले होते. या ठिकाणी एका व्यक्तीला पकडले. त्याच्याजवळ दोन किलो वजनाचा मांडूळ पोलिसांना मिळाले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण काद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मांडूळाला राजीव गांधी प्राणी संग्राहालय येथे दिले आहे. याप्रकरणी पळून गेलेले साथीदार सौरभ जाधव व कालीदास चव्हाण यांना अटक केली आहे.