लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रक्तचंदनाची तस्करी करून टेम्पोतून २७० किलो रक्तचंदन घेऊन जाणा-यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले.
विकी संजय साबळे (वय १९, रा. मांजरी, हडपसर), रोहित रवी रुद्राप (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि अॅलेन कन्हैया वाघमारे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
खंडणीविरोधी पथक २ चे अधिकारी अवैध कारवायांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार भूषण शेलार व अमोल पिलाणे यांना याबाबत माहिती मिळाली होती. कोंढवा परिसरातून एक टेम्पो लोणी काळभोर परिसरात विक्रीसाठी येणार होता. लोणी काळभोर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. यावेळी टेम्पोची तपासणी केल्यावर त्यात २७ लाख रुपयांचा २७० किलो रक्तचंदनाचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा साठा व टेम्पो असा ३२ लाखांचा माल जप्त केला. विकी साबळे व रोहित रुद्राप यांच्याकडे केलेल्या चौकशीत रक्तचंदन विक्रीसाठी अॅलेन वाघमारे याला देणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यालाही पोलिसांनी अटक केली. वन परिमंडळाचे अधिकारी मंगेश सपकाळे व वनरक्षक मनोज पारखे यांनी रक्तचंदनाची पडताळणी करून पोलिसांना तपासात मदत केली.
खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.