पुणे - दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटनं तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी (17 मार्च) अटक केली आहे. या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे.
एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी घटना रोखण्यासाठी देशात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर एटीएसची करडी नजर असते. तसेच या लोकांचा कोणत्याही दहशतवादी कारयावांमध्ये सहभाग आहे की नाही? याची गुप्तपणे तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान, एटीएसच्या पुणे युनिटला शहर परिसरात कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्रे नसताना अनधिकृतरित्या काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून हे तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली होती.