- बजरंग लोहारकर्वेनगर : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. तीन शतकांच्या साक्षीदार असलेल्या या निरोगी व शतायुषी मावळकन्येचे नाव आहे रोशनबी नूरमहंमद शेख. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.संशोधक दत्ता नलावडे तसेच पुणे जिल्हा कल्याण समितीचे सदस्य बाजीराव पारगे यांनी या मावळकन्येचा शतायुषी जीवनपट पुढे आणला आहे.रोशनबी यांचा जन्म १८९७ च्या सुमारास पानशेत धरण भागातील आंबेगाव बुद्रुक (तालुका वेल्हे) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोंडेखान पानसरे असे होते. त्यांना दोन भाऊ होते. सर्व भावंडांत त्या मोठ्या आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी रोशनबी यांचे लग्न डोणजे येथील नूरमहंमद शेख यांच्याशी झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी मोठा मुलगा युसूफ हा दुसरीकडे स्थायिक झाला. धाकटा मुलगा मकबूल याचे निधन झाले. त्यांच्या पत्नी रहेमदबी या त्यांचा सांभाळ करत आहेत. रहेमदबी यांना मूलबाळ नाही.रोशनबी यांना कोणताही आजार नाही. काही वर्षांपूर्वी रोशनबी शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा डॉक्टरकडे जावे लागले. त्यावेळी त्यांचा उजवा पाय शस्त्रक्रिया करून कापण्यात आला. हा अपवाद वगळता त्या आयुष्यात कधीही दवाखान्यात गेल्या नाहीत.रोशनबी स्पष्ट बोलतात. त्यांना कमी ऐकू येते. सून बाहेरगावी गेल्यावर त्या घरात एकट्या असतात. अस्सल मावळी भाषेत तसेच पारंपरिक उर्दू भाषेत त्या बोलतात. रोशनबी शेख यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य येथील रहिवाशांना चकित करित आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नवनाथ पारगे व सुनील भामे यांनी याबाबत खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका चक्करवार यांनी रोशनबी शेख यांची तपासणी केली असता त्यांचे वय पाहून त्या थक्क झाल्या, रोशनबी शेख यांचा रक्तदाब तसेच ठणठणीत प्रकृती पाहून काही लाखांत अशा वयोवृद्ध महिला असाव्यात असे डॉ. चक्कवार म्हणाल्या. मतदान ओळखपत्रावरील वयानुसार रोशनबी यांचे वय ११० वर्षे आहे. मात्र, त्यांचे वय ११५ ते १२० वर्षे इतके असावे, असे डॉ. चक्करवार यांनी सांगितले.अपंगत्वावर मात करत त्या स्वत: शौचास जातात. चालताना थकवा येत असल्याने त्या अंथरूणावर झोपून असतात, मात्र त्या अंथरूणावर उठून बसतात. दररोज सकाळी ७ वाजता त्यांचा दिनक्रम सुरू होतो. सून रहेमतबी त्यांना आंघोळ करून चहा, नाष्टा देतात. दुपारी एक वाजता वरण-भात, भाजी व रात्री जेवण घेतात. जेवणात मटण, मासे त्या घेतात. मिश्री, तंबाखूची त्यांना सवय आहे.
तीन शतकांची साक्षीदार मावळकन्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:43 AM