---
बारामतीत एकाला मारहाण करून लुटले
बारामती : पैसे भरण्यासाठी बँकेत निघालेल्या एकाला तिघांनी वाटेत अडवून मारहाण करीत त्यांच्याकडील अडीच हजारांची रोकड, पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदानकार्ड हिसकावून पळवून नेले. ही घटना १० मार्चला सायंकाळी सातच्या सुमारास कल्याणी कॉर्नर एमआयडीसी रोड येथे घडली. याबाबत प्रमोद सीताराम रविदास यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद रविदास हे दहा मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या ट्रान्सफर ऑफिसमधून घरी निघाले असताना समोरून २० ते २५ वयोगटातील तीन तरुण आले व त्यांनी लोखंडी गजाने मारहाण करत २५०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर प्रमोद यांनी २३ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
--
संसारात लक्ष देत नाही म्हणून मुलाने केली आई-वडिलांना मारहाण
--
वडगाव निंबाळकर : माझ्या संसारात अजिबात लक्ष देत नाही म्हणून मुलाने चिडून वडिलांनाच मारहाण केल्याची घटना वाकी (ता. बारामती) गावाच्या हद्दीतील पिंपळाचा मळा येथे मंगळवारी घडली.
याबाबत राजेंद्र बबन जगताप यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिजाबाई बबन जगताप या त्यांच्या मोठ्या मुलाच्या घरात बसलेले असताना त्यांचा मधला मुलगा राजेंद्र जगताप हा अचानक घरात घुसला व माझ्या संसारात तुम्ही अजिबात लक्ष देत नाही म्हणून त्याने आई जिजाबाई यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध करण्यासाठी वडील बबन हे मध्ये पडले तेव्हा त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भाऊ सुभाष हा मध्ये पडला. त्या वेळी त्याच्या अंगावरही काठी घेऊन धावून गेला व दमदाटी करत शिवीगाळ केली. याप्रकरणी जिजाबाई बबन जगताप यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
--