लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या विषारी व दूषित पाण्याच्या कारणावरून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उचला. शनिवारी तब्बल तीन कंपन्या बंद करत १५ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने बजावल्या आहेत. महात्मे डायकेम, यू. के. इंटरमेडिऐट आणि अर्थकेम लॅबोरेटरी या कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. उशिरा का होईना पण प्रशासनाला अखेर जाग आली आहे.
कुरकुंभ ौद्योगिक वसाहतीत येथील कंपन्यांमार्फत प्रदूषण केले जात होते. याबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी तर काही अज्ञातांनी चाऱ्या फोडल्याने दूषित पाणी शेतात गेल्याने माठे नुकसान झाले होते. यामुळे येथून येणाऱ्या वारंवार तक्रारींची दखल अखरे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला घ्यावी लागली. मंडळाच्या पथकाने शनिवारी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची पाहणी करून दोषी असणाऱ्या वरील तीन कंपन्या त्वरित बंद करण्याचे आदेश देत त्यांचे वीज व पाणी बंद केले. तर सुयश ऑरगॅनिक्स, भूशिल्पा केमिकल, सिद्धी विनायक केमिकल्स, रॉयल एम्ब्रॉयडरी, चार्म्स केमिकल्स, एक्सप्लिसीट केमिकल्स, कुलकर्णी ऑरगॅनिक्स यांना प्रस्तावित सूचना दिल्या आहेत. तर विनामॅक्स ऑरगॅनिक्स, रेणुका, जे. पी. लॅबोरेटरी, विश्वा लॅब, रामकमल केमिकल्स यांना प्रकल्प बंद का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली. हार्मोनी ऑरगॅनिक्सची प्रदूषण मंडळाकडे असणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्यात आली आहे. तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
चौकट
‘लोकमत’च्या वृत्तांची दखल
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात येणाऱ्या रासायनिक विषारी व दूषित पाणी अडवण्याची घेतलेल्या तटस्थ भूमिकेने थेट पुणे-सोलापूर महामार्गावरच सर्व पाणी जमा झाले होते. परिणामी, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त दिले होते. यामुळे प्रशासनाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. याचा आधार घेत प्रदूषण मंडळाने ही कारवाई केली आहे. कुरकुंभ येथे रासायनिक प्रकल्पावर झालेल्या कारवाईमुळे येणाऱ्या काळात प्रदूषणाच्या समस्येवर काही प्रमाणात लगाम लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, या कारवाईने प्रदूषण मंडळाचा अंकुश किती दिवस टिकणार, हे पाहणे गरजेचे आहे.
चौकट
रहस्यमय कारवाई
पुणे-सोलापूर महामार्गावरील चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फोडून रासायनिक विषारी व दूषित पाणी शेतात व कुरकुंभच्या ओढ्यात सोडून देण्यात आले. मात्र, ही कारवाई कोणी केली याबाबतचे रहस्य उलगडत नाही. तहसीलदार संजय पाटील यांनी ही कारवाई रस्ते प्रशासनाने केली असल्याचे सांगितले. मात्र, रस्ते प्रशासनाने तो मी नव्हेच ही भूमिका घेतल्याने कारवाई कोणी केली? याबाबत कुरकुंभ येथे चर्चेला उधाण आले आहे.