पुणे : आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे घोडनदी शेजारी फिरायला गेलेल्या तीन भावंडाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रज्योत विकास होले (वय १४), तेजल विकास होले (वय १९), आणि अंकिता अनिल बोराडे (वय १९) असे या भावंडांची नावे आहेत. यातील दोघांचे मृतदेह रात्री साडेनऊच्या सुमारास ग्रामस्थांना नदीत तरंगताना दिसल्याने ही घटना कळली. शिनोली येथे अनिल बोराडे यांच्याकडे प्रज्योत आणि तेजल हे दोघे बहिणभाऊ सुट्यांसाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ते तिघे गावातील मुक्तादेवी मंदीर परिसरात फिरायला गेले होते. यानंतर ते घरी परतले नाहीत. यामुळे शंका आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही ग्रामस्थांना घोडनदीच्या पात्रात दोन मुलींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यानंतर शिनोली ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह तेजल आणि अंकीताचे होते. ग्रामस्थांनी प्रज्योतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो आढळला नाही. रात्री उशीरापर्यंत ग्रामस्थ शोध कार्य करत होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रज्योत आणि तेजल हे दोघे सख्ये बहिण भाऊ आहेत. तर अंकिता ही त्यांची मावस बहिण होती. डिंभे धरणातून सध्या घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू असल्यामुळे नदी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ही मुले वाहून गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.