लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गावठी रिव्हॉल्व्हर, कोयते बाळगणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी करता दोन दुकानांचे शटर उचकटून केलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यातील २ लाख १८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर व कोयता जप्त करण्यात आला आहे.
ओंकार उमेश सातपुते (वय २१), प्रीतम विठ्ठल ठोंबरे (वय १९), साहिल आनंद मोरे (वय १८, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांच्या विरुद्ध आर्म अॅक्टनुसार भारती विद्यापीठ पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज घाट परिसर, स्वामीनारायण परिसर गुजरवाडी परिसरातील वाढत्या जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. तेव्हा संतोष भापकर, सचिन पवार, राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, नवीन बोगद्याजवळ जांभुळवाडी येथे दोघे शस्त्रधारी व्यक्ती लूटमारीच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी राजू वेगरे, रवींद्र भोसले, संतोष भापकर, नीलेश खोमणे, सचिन पवार, राहुल तांबे यांच्या पथकाने सापळा रचून ओंकार व प्रीतम या दोघांना ताब्यात घेतले.
दोघांची झडती घेतली असता, गावठी रिव्हॉल्व्हर व कोयता मिळून आला आहे. अधिक चौकशी केली असता, त्यांचा अन्य एक साथीदार साहिल आनंद मोरे याच्या मदतीने १६ जानेवारी रोजी आंबेगाव बुद्रुक परिसरातील गणेश सुपर मार्ट व सुप्रिया किराणा दुकान फोडून घरफोडी केल्याचे कबूल केले. चोरी केलेल्या रकमेपैकी पोलिसांनी आरोपीकडून २ लाख १८ हजार रुपये जप्त केले आहेत. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.