पुणे : व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने पहिल्या संतोष मते करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंहगड रस्त्यावरील व्हिजन स्पोर्ट्स सेंटर येथे २३ फेब्रुवारीपासून होणार आहे.
सामने प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी खेळविण्यात येणार आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार असून प्रत्येक संघ ३ साखळी सामने खेळणार आहे. त्यातील अव्वल २ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ८ एप्रिलला होणार आहे.
व्हिजन स्पोर्ट्स सेंटरचे संस्थापक संतोष मते यांनी सांगितले की, झटपट क्रिकेटमुळे उदयोन्मुख व्यावसायिक क्रिकेटपटूंचा एकदिवसीय क्रिकेट किंवा प्रथम दर्जाच्या अनेक दिवस चालणाऱ्या क्रिकेटसारख्या अस्सल क्रिकेट प्रकारांवरील लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपाकडे वळण्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची तयारीही कमी झाली आहे.
अनेक दिवस चालणाऱ्या सामन्यांचा अनुभव पुण्यातील व्यावसायिक व उदयोन्मुख खेळाडूंना मिळावा याच उद्देशाने तीन दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. व्हिजन क्रिकेट अकादमी, श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, २२ यार्डस आणि व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी हे निमंत्रित ४ संघ स्पर्धेत झुंजणार आहेत.