पुणे : लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात सलग तीन दिवस मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. शहर व जिल्ह्यात मतदानापूर्वी दोन दिवस व मतदानाच्या दिवशी, असा तीन दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्रीची सर्व दुकाने या काळात बंद राहणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यात मद्यविक्री तीन दिवस बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला. निवडणूक काळात मद्याचा साठा होऊ नये, यासाठी मद्यनिर्मितीच्या कंपन्या व घाऊक दुकानांजवळ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत; तसेच नेहमीपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या दुकानांचे ग्राहक नेमके कोण आहेत, याची चौकशी करणार आहे. निवडणूक काळात मद्यविक्रीच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केले जाणार आहे. मतदारसंघाच्या सीमारेषेपासून दहा किलोमीटरपर्यंत मद्याविक्री बंद ठेवणार आहे. निवडणुकीच्या काळात परराज्य व इतर जिल्ह्यांतून मद्य आणले जाऊ शकते. मात्र, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी छापा टाकला जाणार आहे. निवडणुकीच्या काळात मद्याचा अतिरिक्त साठा होऊ नये, या उद्देशाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या अगोदर दोन दिवस आणि मतदानाच्या दिवशी मद्य विक्रीचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
निवडणुकीमुळे तीन दिवस ‘ड्राय डे’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:21 AM