पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाचा भू-संपादन अधिकारी असलेल्या धनाजी किसनराव पाटील (वय ५१, रा. कोथरूड) याच्याकडे कोट्यवधींची माया असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान पाटीलसह दोघांना ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला.पाटील आणि संजय पांडुरंग मोरे ( वय ४६, धानोरी पुणे) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत ८३ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांची १८ गुंठे जमीन रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात शासनाकडून तक्रारदार यांना ८३ लाख ६० हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली होती. ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी पाटील याने तक्रारदाराकडे सव्वा लाखाची लाच मागितली. मात्र, लाच देणे तक्रारदारांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाटीलसह त्याच्या साथीदाराला अटक केली. त्या वेळी एसीबीने केलेल्या तपासात पाटीलच्या अंगझडतीमध्ये ५२ हजार रोख मिळाले. तसेच त्याच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये एक लाखाची रोकड सापडली आहे.घराच्या झडतीमध्येदेखील ९८ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. त्याची सध्याची राहती सदनिका हा ६० लाखांची असून बालेवाडी परिसरात त्याची ३ हजार ९०१ चौरस फुटांची मोकळी जमीन आहे. बिबवेवाडी येथील नवकार रेसिडेन्सी येथेही त्याची सदनिका आहे. तसेच त्याच्याकडे २७५ चौ. फूट दुकानाची कागदपत्रे सापडली आहेत.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील धामणगाव येथे धनाजी पाटील याची १०० एकर जमीन असल्याची माहिती एसीबीला मिळाली आहे. तो याबाबत एसीबीला काहीही सांगत नाही.तपासास सहकार्य करत नाही. त्याने आणखी कोणाकडून लाच स्वीकारली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
कोट्यवधींची माया उघड, लाचखोर भू-संपादन अधिकाºयाला तीन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 7:01 AM