पुणे : राज्यात पावसाचा जोर कायम असून, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवार वगळता पुणे जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्रातील कच्छच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंतच्या चक्रवातामुळे राज्यात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शनिवारी, सोमवारी व मंगळवारी पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यासोबत साताऱ्यामध्येही शनिवारी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी झाली. त्यात दावडी २१०, ताम्हिणी १९४, लोणावळा १५९, वलवण १२५ मिमी असा पाऊस पडला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत पालघर, ठाणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे नंदूरबार जळगाव जिल्ह्यात मात्र, हलका मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मराठवाड्यात जालना हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत शनिवारी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही येत्या तीन दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
शहरात रिपरिप
पुणे शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री मात्र काही भागात जोरदार सरी कोसळल्या. येत्या चार दिवसांत शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शहरात रात्री साडेआठ वाजता केलेल्या नोंदीनुसार शिवाजीनगर येथे ४.३, लोहगाव येथे १.८, तर मगरपट्टा येथे २.५ मिमी पाऊस पडला. चिंचवड येथे ३.५ व लवळे येथे ८ मिमी पाऊस झाला.
धरणसाखळीतील चित्र
खडकवासला प्रकल्पांतील धरण क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर गुरुवारच्या तुलनेत कमी होता. त्यात खडकवासला - २, पानशेत २०, वरसगाव १७, टेमघर २५ मिमी पाऊस झाला. चारही धरणांत एका दिवसांत ०.७५ टीएमसी पाणीसाठा वाढला. एकूण पाणीसाठा ५.७१ टीएमसी झाला आहे.