केडगाव: केडगाव (ता. दौंड) येथील एका खासगी रुग्णालयात एकाच दिवशी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला. मात्र, या ठिकाणी बुधवारीच साठ ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
केडगाव येथील मुख्य बाजारपेठेमध्ये हे कोविड सेंटर आहे. येथे पेशंट यवत, ताम्हणवाडी व कर्जत (जि. अहमदनगर) येथील रुग्ण दाखल होते. यातील २६ वर्षांच्या युवकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. गंभीर प्रकृती असल्याने त्याचा मृत्यू झाला असे रुग्णालयाच्या प्रशासनामार्फत सांगण्यात आले. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी हुज्जत घातली. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जमाव वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व तहसीलदार संजय पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
संबंधित डॉक्टरांनी मृत पावलेल्या नातेवाईकांना पैसे परत केले.
काही नातेवाईकांनी केडगाव पोलीस चौकी मध्ये जाऊन गोंधळ घातला. यवत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याबाबत विचारणा केली. रात्री उशिरा रुग्णांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतले. दिवसभर यवत पोलिसांनी परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला व परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
कोट
संबंधित रुग्णालयास प्रशासनामार्फत मंगळवारी ( २७ एप्रिल) ६० सिलिंडर पुरवण्यात आले होते. या दवाखान्याच्या वाढीव बिलाबाबत ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होत्या. याबाबत प्रशासनामार्फत चौकशी समिती नेमली जाईल.
संजय पाटील, तहसीलदार, दौंड