पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघात २००९, २०१४ आणि २०१९ या तीन निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून ५८ उमेदवार रिंगणात उभे होते. या सर्व उमेदवारांना मिळालेली मतांची गाेळाबेरीज करता ४४ हजार ६५७ मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. अपक्ष म्हणून किती उमेदवार रिंगणात उतरतील हे गुरुवारी (दि. २५) स्पष्ट होणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे रिंगणात आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २५ एप्रिलपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ एप्रिल आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आकडे काय सांगतात?
सन - उमेदवारांची संख्या - मिळालेली मते
२००९ - २४ - २३ हजार
२०१४ - १९ - १३ हजार
२०१९ - १५ - ८ हजार ४३४
ठळक वैशिष्ट्ये :
- सन २००९ च्या लाेकसभा निवडणुकीत गेल्या तीन लोकसभा निवडणुकीचा विचार करता अपक्ष उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली होती. यात अमानुल्ला मोहम्मद अली खान यांना ३ हजार ०८८ मते मिळाली होती. याच निवडणुकीत सर्वात कमी (२८९) मते श्रीकांत मधुसूदन जगताप यांना मिळाली हाेती.
- सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल धर्मा दांबळे यांना २,२५९ मते मिळाली होती. सर्वात कमी मते विजय लक्ष्मण सरोदे (३०३) यांना मिळाली आहेत.
- सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात अपक्ष उमेदवार आनंद प्रकाश वांजपे यांना १,३४३ मते मिळाली होती. सर्वांत कमी मते चंद्रकांत परमेश्वर सवांत यांना १६१ मते मिळाली होती.
नोटाला मिळाली १७,४३९ मते :
तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कुणालाही मत द्यायचे नसेल, तर तुम्ही नोटा बटण दाबू शकता. याचा अर्थ निवडणूक लढविणारा एकही उमेदवार तुमच्या मते पात्र नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ६ हजार ४३८ मतदारांनी नोटाला मतदान केले. २०१९ मध्ये तब्बल ११,००१ मतदारांनी नोटाला मते दिली आहेत.