पुणे : काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेले पुण्यातील शिवाजीनगर भागातील तीन उड्डाणपूल वाहतूक नियोजनासाठी पाडणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले आणि सुस्थितीत असलेले उड्डाणपूल पाडले जाणार असल्याचे खुद्द पवार यांनीच सांगितल्याने मात्र पुणेकरांना धक्का बसला आहे.
पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्राच्या कार्यालयाचे उदघाटन प्रसंगीते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरीच्या महापौर उषा ढोरे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यातील उडडाणपूल सुशोभित करावेत अशी अपेक्षा बोलून दाखवली. त्याचा संदर्भ घेत पवार यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर शिवाजीनगर भागातील उड्डाणपूल काढण्याची सूचना काहींनी केली आहे. इ स्केअर थिएटर, राहुल थिएटर आणि पुणे विद्यापीठासमोरचा पाडून त्याजागी वेगळी उभारणी करावी लागणार आहे. त्यासाठी खालच्या मजल्यावर रस्ता त्याच्या वर एक पिलर आणि त्यावर चार पदरी रस्ता आणि सर्वात वरती मेट्रोची मार्गिका अशी उभारणी असणार आहे.त्यामुळे स्थानिक लोकांना खालच्या रस्त्यावरून तर इतर भागातून येणाऱ्या नागरिकांना मधल्या स्तरावरून जाता येईल. अशी रचना नागपूर आणि इतर शहरांमध्येही केली आहे. थोडासा त्रास होईल, पुणेकरांना सहनशक्ती वाढवावी लागेल मात्र असं झालं तर वाहतूक प्रश्न कायमचा सुटेल. त्यासाठी पीएमआरडीए आणि टाटा कंपनीसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी मत- मतांतरे होतील मात्र नाही केले तर पुढची १०० वर्षे लोक नाव ठेवतील असेही सांगायला ते विसरले नाहीत.