शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती अशी की, १८ जानेवारीला टाकळी हाजी येथे भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी सर्कल ऑफिसजवळ स्वप्निल रणसिंग या तरुणाची आठ गोळ्या घालून हत्या केली होती. यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती.
हा हल्ला करणारे कोयत्या ऊर्फ विजय गोविंद शेंडगे, बबलू खंडू माशेरे (दोघे रा. आमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. तर इतर आरोपी नितीन गीताराम गावडे व त्याचे दोन साथीदार मात्र फरार होते. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पथके पाठवली होती. परंतु, हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दरम्यान, खबऱ्याकडून रणसिंग खून प्रकरणातील फरार आरोपी मंगळवारी न्हावरा फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना गजाआड केले.