पुणे : डेक्कन भागात भाड्याने घेतलेल्या हॉटेल व्यवसायात पाऊण कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने नाशिकमधील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ भारत बाळासाहेब ढेरिंगे (वय २७, रा. मिडोरी सोसायटी, बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक नरेंद्र तापकीर, उमेश शिंदे आणि वरुणराज शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बाळासाहेब ढेंरिगे (वय ५०, रा.पळसे, जि. नाशिक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे यांचे डेक्कन भागात वरुणराज हॉटेल आहे. उमेश शिंदे आणि त्यांचा मुलगा वरुणराज यांनी हे हॉटेल नरेंद्र तापकीर यांना चालवायला दिले होते. शिंदे यांनी तापकीर यांच्याबरोबर करार केला होता. नाशिक भागातील शेतकरी बाळासाहेब ढेरिंगे यांचा मुलगा भारत तेथे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. दोन वर्षांपूर्वी तो पुण्यात आला होता. विवाहित असलेल्या भारत यांचा तापकीर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर तापकीर यांनी वरुणराज हॉटेल भारत यांना चालवायला दिले होते. हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यापोटी २५ ते ३० लाख रुपये खर्च झाल्याचे तापकीर यांनी त्याला सांगितले होते. भारतने तापकीर यांना ५० लाख रुपये दिले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तापकीर यांचा करारनामा संपल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा हॉटेल चालविण्यास मागितले होते. त्यानंतर तापकीर यांनी भारत याला हॉटेल सोडण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत नैराश्यात होता. त्याने तापकीर आणि वरुणराज हॉटेलचे मालक शिंदे यांची भेट घेतली होती. या प्रकरणात काही तोडगा काढा, असे त्याने सांगितले होते. महिनाभरापूर्वी भारतने पुन्हा काही रक्कम त्यांना दिली होती. हॉटेलवरचा ताबा सोडण्यास त्याला सांगण्यात आले होते. गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तसेच फसवणूक झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे भारत यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करत आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 8:43 PM
तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़
ठळक मुद्दे गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली.