पुणे :गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन गुन्हेगारांवर परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपारीची कारवाई केली. या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सागर श्रावण पवार-पाटोळे (२८, रा. डुक्करखिंड), प्रथम ऊर्फ मनोज विनोद ससाणे (२०, रा. भवानी पेठ), गणेश अरुण गायकवाड (२४, रा. शंकर महाराज वसाहत) अशी या आरोपींची नावे आहेत. सहकारनगर आणि स्वारगेट पोलिस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तिघांना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, अशा सतत गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहावा यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठवला होता. त्यानुसार चौकशी करून ही कारवाई करण्यात आली आहे.