फसवणूक करुन ९ महिन्यांपासून फरार असणारे भरतकुमार चरणदास जोशी (वय ६३) व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी (वय ३६), हिरेन भरतकुमार जोशी (वय ३४, तिघेही रा. शिर्के हॉस्पिटलजवळ, उरुळी कांचन, मूळ रा. सहयोगनगर, भुज, कच्छ, गुजरात) यांना लोणी काळभोर पोलिसांनी पाकिस्तान सीमारेषा भुज, कच्छ (गुजरात) येथे जाऊन जेरबंद केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षांच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरुन व आरटीजीएसने रक्कम घेऊन त्यांना कसल्याही प्रकारचा आकर्षक परतावा परत न देता तसेच त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली. काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेशाद्वारे व रोखीने घेऊन त्यांना परत न देता त्यांनी सन २०१३ ते सन २०१९ या कालावधीमध्ये एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केली. परंतु भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक मोठ्या असामींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केली असल्याची चर्चा आहे. यांमुळे ज्या नागरिकांची वरील पध्दतीने फसवणूक झाली आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे,
पुणे शहर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.