पुणे : गॅस व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या सम्यक पत्रकार संघाच्या अध्यक्षासह तीन बातमीदारांना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून २ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
सम्यक संपादक पत्रकार संघाचा अध्यक्ष सुहास मारुती बनसोडे (वय ४०, रा. कोंढवा), मोईन लाडलेसाहेब चौधरी (वय ४५, रा. येरवडा) आणि वसिम अकबर शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत योगेश नवनाथ शिंदे (वय ३१, रा. उरुळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे येरवडा येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. गॅस एजन्सीमधील सिलिंडरच्या टाक्या ग्राहकांना घरपोच केल्या जातात. मात्र, काही ग्राहक एजन्सीमध्ये थेट येऊन सिलिंडरच्या टाक्या घेऊन जातात. मोईन चौधरी आणि वसिम शेख यांनी गॅस एजन्सीमध्ये येऊन ग्राहक सिलिंडर टाक्या घेऊन जात असल्याचे फोटो व व्हिडीओ काढले. तसेच गॅस एजन्सी बंद करण्याबाबत इंडियन ऑईल कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानुसार कंपनीच्या विपणन अधिकारी स्वातील उडुकले यांनी एजन्सीमध्ये येऊन पाहणी केली होती. ही तक्रार मागे घ्यायची असल्यास तुम्हाला २ लाख रुपये रोख व दर महिना प्रत्येकी ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी खंडणीची मागणी सम्यक संपादक सुहास बनसोडे याने तक्रारदारांना फोन करून केली होती. याबाबत शिंदे यांनी खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शिंदे यांना मार्केट यार्ड येथील जी. एस. टॉवर येथे बोलविले होते. त्यानुसार पथकाने तक्रारदार शिंदे यांच्याकडे काही ख-या व बाकी खोट्या नोटांचे २ लाख रुपयांचे बंडल तयार केले. तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये स्वीकारताना पथकाने तिघांना पकडले.