लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन गावच्या हद्दीत, इरिगेशन कॉलनीनजीक शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास महामार्गावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका १४ वर्षांच्या मुलांसह तिघे ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजाभाऊ विश्वनाथ पंडित (वय ४०), त्याचा मुलगा अंकुश राजाभाऊ पंडित (वय १४) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचाटे (वय ३५, तिघेही रा. धामोणी, ता. सोनपेठ, जि. परभणी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर टँकरमधील क्लीनर मेघराज नाथाराव हनवटे (वय ३६, रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड), अमित राजाभाऊ पंडित (वय १३), त्याची आई इंदुबाई राजाभाऊ पंडित (वय ३५, दोघही रा. धामोणी, ता. सोनपेठ, जि. परभणी), कांताबाई मरिबा उजगरे (वय ६०, रा. मांडवा, परळी वैजनाथ, जि. बीड) व ट्रकचालक सैफान शेख (वय २३, इंदापूर) आणि क्लीनर अमिर शेख असे सहा जण जखमी झाले आहेत. सैफान गंभीर जखमी असून सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धामोणी येथील पंडित कुटुंबीय भारतनगर, वाशीनाका, नवी मुंबई येथे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या आंबेडकर जयंतीसाठी ते आपल्या मूळ गावी आले होते. पुन्हा कामावर राजाभाऊ पंडित आपली पत्नी इंदुबाई, सासू कांताबाई व मुले अंकुश, अमित, सुमित यांच्यासमवेत नवी मुंबईकडे गावातील एकनाथ बाचाटे यांचा टँकर मुंबईला निघाला असल्याने शुक्रवारी त्यांत बसून निघाले होते.हा टँकर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर उरुळी कांचन गावच्या हद्दीत, इरिगेशन कॉलनीनजीक आला. त्या वेळी महामार्गाच्या मध्यावर चाक पंक्चर झाल्याने एक वाळूचा ट्रक सर्व दिवे बंद करून महामार्गावरच थांबला होता. ट्रकचालक सैफान व त्यांचा भाऊ महेश रस्त्यावर उतरून पाहणी करीत असताना, टँकरचालक बाचाटे यांस त्याचा अंदाज न आल्याने टँकरने महामार्गावर उभा असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या वेळी महेश पळाल्याने तो थोडक्यात बचावला. परंतु टँकरमधील ७ व ट्रकनजीक असलेले दोघे असे एकूण ९ जण यांमध्ये जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकरमध्ये अडकून पडलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढले; तसेच त्यांना लोणी स्टेशन येथील विश्वराज रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरांनी सर्वांची तपासणी केली. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच अंकुश राजाभाऊ पंडित व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचाटे यांचा मृत्यू झाला होता. राजाभाऊ विश्वनाथ पंडित याचा शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
ट्रक-टेम्पोच्या धडकेत लहानग्यासह ३ ठार
By admin | Published: May 07, 2017 2:37 AM