पुणे/पिरंगुट : पिरंगुट (ता,मुळशी) नजदीक असलेल्या लवळे फाटा येथे ट्रक व दुचाकी याचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर, एक व्यक्ती जखमी झालेला आहे. यामध्ये रेश्मा (वय २५ वर्ष) या महिलेचा व त्यांचा मुलगा रिवांश पवन पटेल (वय सहा महिने ) या बालकाचा मृत्यू झाला आहे. महिलेचे पती पवन रमेश पटेल (वय ३२ वर्षे) हे जखमी झाले आहेत तर नांदे गावचे रहिवासी तानाजी विठ्ठल ढमाले (वय वर्ष अंदाजे ३० ते ३५ वर्ष) यांचादेखील या अपघाता दरम्यान मृत्यू झाला आहे.
या दुर्घटने बाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुण्याकडून पौडच्या दिशेने फरशी भरलेला (एम.एच.12 के.आर 7706) मालवाहू ट्रक जात असताना हा ट्रक पिरंगुट घाटामध्ये आला तेव्हा या ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत अथवा इतर बिघाड झाला असावा. कारण हा ट्रक पिरंगुट घाटामध्ये आल्यानंतर सुसाट वेगाने तो पिरंगुटच्या दिशेने आला तेव्हा येताना त्याने तीन ते चार चारचाकी वाहनांना धडक देखील दिली. परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा ट्रक बरोबर लवळे फाटा येथील बस स्टॉप समोर आल्यानंतर ट्रकचालकाने (शशिकांत बाबू मांडवे उरुळी कांचन वय २३ वर्ष ) रस्ता सोडून डाव्या बाजूला हा ट्रक घातला. तेव्हा या धांदली दरम्यान त्याच्यासमोरून दुचाकीवरून पिरंगुट येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर पवन पटेल तसेच त्यांच्या पत्नी व मुलगा हे तिघे चालले असताना त्यांची दुचाकी या ट्रकच्या खाली आली. या दुर्देवी अपघातात पवन रमेशराव पटेल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी रेश्मा पवन पटेल व छोटा मुलगा रिवांश पवन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तेव्हा जखमी पवन पटेल यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी, जवळच दुचाकीवर असलेले तानाजी विठ्ठल ढमाले हे देखील ट्रकच्या खाली आल्याने त्यांचादेखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने हा ट्रक ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याने वाळूचा ढीग होता. त्या वाळूच्या अडथळ्यामुळे हा ट्रक जाग्यावरती उभा राहिला व पुढील आणखी मोठा अनर्थ टाळला. तेव्हा तातडीने ट्रक चालकास त्या ठिकाणी उभे असलेले माऊली भालके व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या दुर्घटनेनंतर या ठिकाणी काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते, पौड पोलिस व नागरिकांच्या सहकार्यामुळे येथील ट्रॅफिक लवकरच सुरळीत करण्यात आले.