पुणे: दिलेले टास्क पूर्ण केले तर चांगला मोबदला मिळेल असे सांगून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३१ जुलै ते ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. अधिक माहितीनुसार, तक्रारदार महिलेला अनोळखी क्रमांकावरून ‘पार्टटाइम काम करण्यासाठी करण्यास इच्छुक आहात का? टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देऊ.’ असा मेसेज आला. तक्रारदार महिलेने होकार दिला असता महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये सामावून घेतले. त्यानंतर सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा दीडशे रुपये मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तब्बल ३ लाख १४ हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने महिलेने विचारणा केली असता, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक ढवळे पुढील तपास करत आहेत.