पुणे : आई रागावते, मारहाण करते, म्हणून रागावलेल्या ९ वर्षाच्या मुलीने आपल्या ६ वर्षाची बहिणी आणि ५ वर्षाच्या भावाला घेऊन घरातून निघून गेली. हे समजताच लोणी काळभोर पोलिसांची धावपळ उडाली. चार पथके नेमून त्यांनी सर्वत्र शोध घेतला. चार तासाच्या शोधानंतर ही मुले कॅम्पमधील एका मशीदीबाहेर मिळून आल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कदमवाक वस्तीत राहत असून त्यांचा पती लोणी स्टेशनवर काम करतो. फिर्यादी रमजानच्या काळात मशीदीबाहेर भीक मागत असतात. त्या नेहमी आपल्या मुलांना मारहाण करीत. रागवत. यामुळे त्यांची ९ वर्षाच्या मुलीला राग आला. रविवारी सायंकाळी ती आपली ६ वर्षाची बहिण व ५ वर्षाचा भाऊ यांना घेऊन घरातून बाहेर पडली. रात्री मुले घरी न असल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतले. तातडीने चार पथके स्थापन करुन या मुलांचा शोध सुरु झाला. कदमवाक वस्तीपासून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात हे तिघे जण बसने पुण्याकडे गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पुण्यात शोध घेण्यात आला़ कॅम्पमधील कुरेशी मशीदबाहेर ही मुले पोलिसांना मिळून आली. तब्बल ४ तासांच्या प्रयत्नांना यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस उपनिरीक्षक हंबीर यांनी सांगितले की, आई रागवते, म्हणून ही मुले घरातून निघून गेली होती. बसने ते पुलगेटला आले. तेथून ते कॅम्पमध्ये फिरत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबाच्या हवाली केले आहे.