पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या हळंदे टोळीतील तिघांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी -चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. परिमंडळ ५च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
दर्शन युवराज हळंदे (वय २०), सागर ऊर्फ सुधीर महादेव मसणे (वय १९), खुशाल ऊर्फ दाद्या संतोष शिंदे (वय २०, तिघे रा. राजीव गांधीनगर, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी तडीपारांची नावे आहेत.
तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यासह शहरातील इतर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. हळंदे हा त्याच्या साथीदारांसोबत परिसरातील नागरिकांना अडवून मारहाण करणे व शिवीगाळ करून दमदाटी करणे. एवढेच नाही तर वेळप्रसंगी हत्याराचा धाक दाखवत जीवे ठार करण्याच्या धमकीने लुटणे, खंडणी उकळणे अशा प्रकारचे गुन्हे करीत होते. परिसरात टोळीची दहशत असल्यामुळे स्थानिक नागरिक तक्रार करण्यास समोर येत नव्हेत. त्यामुळे तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त पाटील यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार त्यांना २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.